देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर चढवला हल्ला

NCRB चा अहवाल कसा वाचतात तेच शिकवतो !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 20, 2023 16:03 PM
views 252  views

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज बुधवारी दहाव्या दिवशी विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत आहेत. विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावातून महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर बोट ठेवत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी माजी गृहमंत्री जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांना उद्देशून NCRB चा अहवाल कसा वाचतात तेच आज शिकवतो असे म्हणत विरोधकांवर शरसंधान साधले. 


नियम 292 अंतर्गंत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांनी प्रस्ताव मांडला ते नाना पटोले येथे नाहीत, या प्रस्तावात विरोधकांनी विदर्भाच्या चर्चेचा एकही विषय दिला नाही. मला अपेक्षा होती की, अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विदर्भाचा विषय घेतील. विरोधी पक्षनेते विदर्भाचे असतानाही तो आला नाही, शिवसेनेचे सुनील प्रभू येथे आहेत. स्वतः उद्धव ठाकरेंनी मीडियाशी बोलताना म्हटलं होतं की, विदर्भावर बोला पण सुनील प्रभूही बोलले नाहीत. म्हणून मी या गोष्टीचा खेद करतो. तेव्हा विदर्भात आलेल्या विरोधी पक्ष्याला विदर्भाचा विसर पडला असे म्हणणं चुकीचं ठरणार नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाना पटोलेंनी हा प्रस्ताव मांडला, मात्र खरं तर विरोधी पक्षनेत्याने हा प्रस्ताव मांडायला हवा होता. परंतु तो मांडू दिला नाही, तेव्हा असं वाटतं की, विजय वडेट्टीवार यांच्यावर त्यांच्याच पक्षात अन्याय होत आहे. असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांना मिश्कील टोमणा मारला. तर पुढे बोलताना आमचा प्रस्ताव शेतकऱ्यांबद्दल असतानाही विरोधकांनी शेतकऱ्यांबद्दलचा प्रस्ताव मांडला. तेव्हा म्हातारी मेल्याचं दुःख आहे पण म्हातारी मेल्यानंतर काळ सोकावतोय त्याचं दुःख अधिक आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

नाना पटोले ड्रग्जबाबत बोलले, आमच्या सरकारच्या काळात सर्वाधिक कारवाई ही ड्रग्जवर पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली. 24 हजाराहून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली. 2020 मध्ये 5 हजार 321 आरोपींवर कारवाई होती. मागील काही दिवसांत 13 हजार 125 आरोपींवर कारवाई केली. तर एकूण कारवाई ही 24 हजार लोकांवर करण्यात आली आहे. मी आधीच सांगितले की, केंद्राच्या निर्देशानुसार कारवाई केली जात आहे. आता देशातील राज्य एकमेकांना माहिती पुरवत असून, त्यानुसार कारवाई केली जात आहे अशीही माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली

नाना पटोले म्हणाले होते की, पोलीस भरतीच केली जात नाही, पोलिसांवर लोड वाढला आहे. परंतु 23 हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. ही अभूतपूर्व भरती आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचीही व्यवस्थात करण्यात आली आहे. तर रवींद्र वायकरांनी म्हटले होते की, पोलिसांसाठी 1976 च्या आकृतीबंदानुसार काम केले जाते. मात्र हे खरं नाही. 1976 नंतर सरकारने आकृतीबंद तयार केला आहे. त्यानुसार काम केले जाणार आहे. दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर यापासून तर सगळे काही नियम बदलले जात आहे. स्ट्रीट क्राइमपेक्षा आता सायबर क्राइम वाढतेय आहे. ही बदलती परिस्थिती लक्षात घेता नवीन आकृती बंद तयार केला आहे. एकूण एनसीआरबीचा अहवाल बघता, जयंत पाटील आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते तरी त्यांनी अहवालाचे निट वाचन केले नाही. एनसीआरबीचा अहवाल कसा वाचावा हे मी आज सांगतो. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील आणि अनिल देशमुख या दोन्ही माजी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला.