मुंबई : शिवसेना नक्की कोणाची यावर निर्णय घेण्याच्या दृष्टीने पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ठाकरे व शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग ‘धनुष्य-बाणा’चा हक्क कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करुन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता असल्याने तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे. मात्र या प्रकरणासंदर्भात बोलताना ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत मांडताना एका परिस्थितीत आज निकाल लागला तरी अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाकडेच राहू शकतं असं म्हटलं आहे.
उज्जवल निकम यांनी गुरुवारी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना निवडणूक आयोगासमोरील या सुनावणीबद्दल सविस्तर माहिती दिली. “आयोगासमोर सुरु असणारा वाद हा दोन भागांमधील वाद आहे. दोन्ही गटांकडून जे दावे प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही गटांचा दावा आहे की शिवसेनेचं अधिकृत राजकीय चिन्हं आम्हाला मिळावं. यासंदर्भातील पुरावा नोंदणीचं काम दोन्ही गटांकडून पूर्ण झालं आहे असं या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. याचाच अर्थ असा की हा वाद निवडणूक आयोगापुढे अद्यापही प्रलंबित आहे,” असं निकम यांनी सांगितलं.
“पुरावा नोंदणीचं काम बाकी असतानाच सध्या अंधेरीमधील पोटनिवडणुकीप्रमाणे एखादी निवडणूक लागली तर त्यात कोणकोणते राजकीय पक्ष उभे राहतात हे पाहणे महत्तवाचं ठरते. म्हणजे ठाकरे गटाकडून एकच उमेदवार उभा राहणार की शिंदे गटाकडून उमेदवार उभा करण्याचा दावा केला जाणार आहे हे महत्तवाचं आहे. जर ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जात असेल आणि त्याला शिंदे गटाकडून आव्हान देत उमेदवार दिला जात असेल तर राजकीय पक्षाचं चिन्ह हे शिवसेनेकडे राहील. पण निवडणूक आयोगासमोर या चिन्हाबाबतीत वाद निर्माण करण्यात आला तर आयोगाला यासंदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असेल तर निवडणूक चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे,” असं निकम यांनी सांगितलं.
शिंदे गटाने उमेदवार दिला नाही तर ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह मिळू शकेल का? असा प्रश्न निकम यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना निकम यांनी, “निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागेल की शिवसेनेचं जे अधिकृत चिन्ह आहे ते कोणत्या गटाला द्यावं? अद्याप सुनावणी सुरु झाली नसेल तर आयोगासमोर एकच पर्याय असतो आणि तो म्हणजे निवडणूक चिन्ह गोठवणे. पण जर पुरावा सादर करुन झाला असेल आणि युक्तावाद संपला असेल तर निवडणूक आयोगाला उद्याच (शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी) जाहीर करावं लागेल की शिवसेनेचं चिन्ह कोणत्या गटाला दिलं जाणार,” अशी माहिती दिली.
अंधेरी पोटनिवडणूक पाहता तातडीने या प्रकरणाची सुनावणी होण्याची किती शक्यता आहे. की दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जाईल? असा प्रश्न निकम यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना निकम यांनी, “आता निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाकडून काय पावलं उचलली जाते हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे. ठाकरे आणि शिंदे गट काय भूमिका घेणार हे पहावं लागेल. शिंदे गट आणि ठाकरे गट दोघेही चिन्हावर दावा सांगत असतील तर पोटनिवडणुकीच्या चिन्ह वाटपाआधी आयोग निर्णय घेऊ शकेल का हा एक भाग झाला. जर पुराव्यावर आधारित निर्णय घेतला तर आज निकाल लागू शकतो. मात्र पुरावा नोंदणीचं काम अद्याप सुरु आहे असं आयोगाला वाटलं तर त्यांना ते राजकीय चिन्हं गोठवावं लागतं,” असं सांगितलं.