सावंतवाडी - पंढरपूर विशेष गाडीची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 13, 2025 11:06 AM
views 421  views

सावंतवाडी : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपुरातील विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरपूरला जातात. मध्य रेल्वेने नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर, मिरज अशा सर्वच विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील वारकऱ्यांसाठी १ ते १० जुलै या कालावधीत सावंतवाडी-पंढरपूर विशेष गाडी सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.

कोकणातूनही वारकरी बहुसंख्येने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जातात. रेल्वे प्रशासनाने आजवर एकदाही सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी रेल्वेगाडी सोडलेली नाही. कोकणातून पंढरपूर रस्ते मार्गे जवळ असले तरी घाटमाथ्यावरील प्रवासामुळे प्रवासास विलंब होवून कंटाळवाणा प्रवास करण्याची वेळ कोकण भाविकांवर ओढवते. मात्र, ही सेवा सुरू केल्यास रेल्वेने प्रवास आरामदायी होवू शकतो.या पार्श्वभूमीवर १ ते १० जुलै या कालावधीत सावंतवाडी-पंढरपूर मार्गावर विशेष गाडी सुरू करत वारकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी श्री. महापदी यांनी रेल्वे बोर्डाकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.