सावंतवाडी : उद्धव ठाकरेंनी मला मंत्री करण्यासाठी माझ्याजवळ पैसे मागितले होते. मी एक कोटी रुपयांचा चेक दिला होता. जास्त पैसे देऊ शकलो नाही म्हणून दुसऱ्या वेळी मंत्री होऊ शकलो नसल्याचा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला. तर आदित्य ठाकरे देखील म्हणाले होते सिंधुदुर्गात केसरकरच चेहरा आहे. पण, त्यांनी कमिटमेंट पुर्ण केली नाही अस केसरकर म्हणाले.
ते म्हणाले, मला गद्दार म्हणायला तुम्हाला अधिकार काय ? तुम्ही मला निवडून आणले का? मी शिवसेनेत आलो नाही तुम्ही मला बोलवलं. या मतदारसंघात शिवसेनेची फक्त चाळीस हजार मते होती. ती मी एक लाख सत्तर हजारांवर नेली. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली, खासदार यांच्या विजयात माझा वाटा आहे. बाळासाहेब असते तर ते कधीच मला विसरले नसते. मला भाजप पक्षाची ऑफर होती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता. पण, मी भाजपामध्ये गेलो नाही. तेथे गेलो असतो तर राजकारणात फार मोठा झालो असतो अशी खंत केसरकर यांनी व्यक्त केली.