
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोडोली गावात बुधवारी रात्री घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला सुन्न करून गेली. अवघ्या दहा वर्षांच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. अधिक वेदनादायक बाब म्हणजे, श्रावणने आपला अखेरचा श्वास आपल्या आईच्या मांडीवर घेतला. याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणाऱ्या गावडे कुटुंबातील श्रावण बुधवारी संध्याकाळी गणेश मंडळाच्या शेडमध्ये मित्रांसोबत खेळत होता. तो नेहमीप्रमाणेच हसत-खेळत होता. मात्र, काही क्षणांतच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. खेळ सोडून तो धावत घराकडे गेला आणि थेट आईच्या मांडीवर जाऊन विसावला. आईच्या कुशीत डोके ठेवून तो काहीतरी सांगू पाहत होता, पण क्षणार्धात त्याला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि आईच्या मांडीवरच त्याने डोळे मिटले.
श्रावणच्या आईने टाकलेला आर्त हंबरडा आणि मदतीसाठीची धडपड पाहून शेजारी धावून आले. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हा मृत्यू अचानक आलेल्या हृदयविकारामुळे झाला.