डोस दिल्यानंतर सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू

महाड तालुक्यातील वाघोली आदिवासी वाडी इथली दुर्घटना
Edited by: नितेश लोखंडे
Published on: January 13, 2023 11:19 AM
views 475  views

महाड : प्राथमिक आरोग्य केंद्र, बिरवाडी येथील सिस्टर व मांघरून येथील आशा सेविका या दोघीजणी तक्रारदार आहेत, त्यांच्या तक्रारीनुसार मालती प्रदीप पवार (वय 23 रा. वाघोली) यांच्या घरी लहान मुलांना डोस देण्यासाठी गेल्या होत्या. डोस द्यायला गेल्यानंतर मुलगा ऋषभ पवार (वय सहा महिने) या बालकास तीन इंजेक्शन व दोन डोस दिले व त्यानंतर दोन गोळ्यांचे चार तुकडे करून बाळाला ताप आल्यानंतर दुधामध्ये अर्धे-अर्धी गोळी दे, असे आई मालती हिला सांगून त्या निघून गेल्या. त्यानंतर वृषभ या चिमुरड्यांस झोळीमध्ये झोपवला असता दोन वाजता त्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर आई मालती हिने वृषभ यास दुधामध्ये अर्धी गोळी पाजली. दुधामध्ये गोळी दिल्यानंतर मुलगा ऋषभ हा वाकडातिकडा होऊन डोळे फिरवू लागल्याने वृषभची आई मालती हिने आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील लोकांना जमा केले. त्यानंतर चिमूरड्याला रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू झाली परंतु रुग्णालयात नेण्यासाठी गाडी नसल्यामुळे त्यांना वाघोली ते मांघरून पायी चालत यावे लागले. त्यामध्ये त्यांना रुग्णालयामध्ये येण्यासाठी एक तास उशीर झाला. अखेर गाडी मिळाल्यानंतर बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृषभ याला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


नक्की या चिमुरड्याचा मृत्यू कशामुळे असावा, याची माहिती अद्यापही अस्पष्ट आहे. चिमुरड्याचा मृतदेह महाड ग्रामीण आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. यापुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी.पी.शास्त्री करत आहेत.