
पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त रविवारी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा केली. यावेळी विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत मुख्यमंत्री फडणवीस यां नी राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली.
आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल महापूजा संपन्न झाली. यावेळी मानाच्या वारकऱ्याचा मान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याला मिळाला. दामू उगले आणि कल्पना उगले हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी नाशिक जिल्ह्यातूनच निवडला गेलाय. विठ्ठलाचं दर्शन रांग बंद करतेवेळी रांगेमध्ये उभे असणार्या प्रथम दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून मान मिळत असतो. यावर्षी हा मान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले (५२ वर्षे) आणि कल्पना उगले (४८ वर्षे) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नियमित वारी करत आहेत.