राज्यात 700 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'

आरोग्य क्षेत्रासाठी CM शिंदेंच्या महत्वाच्या घोषणा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 03, 2022 16:52 PM
views 359  views

मुंबई : राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’  सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

मुंबईत 227 ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात सुमारे 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच मुंबईत 227 ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 50 दवाखाने 2 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय


प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिकांना जर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.