सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी १० वाजता पहिल्यांदाच सावंतवाडी शहरात येत आहेत. त्यांच्या हस्ते सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजन करण्यात येणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार रवींद्र फाटक, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक आदी मान्यवर नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांचा सावंतवाडी शहराला शंभर कोटीपेक्षा अधिक निधी दिल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहेत. शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कै. रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेसिंग रूम याशिवाय क्रीडा संकुलाचेही भूमिपूजन होणार आहे. तसेच दोडामार्ग रूग्णालय, सावंतवाडी शासकीय पर्णकुटी विश्रामगृह नूतनीकरण लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन कार्यक्रम ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.