सावंतवाडी : शहरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या भूमिपूजनासाठी येत्या मंगळवारी ३० मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीत येणार आहेत. यावेळी त्यांचा सावंतवाडीकरांच्यावतीनं भव्य नागरी सत्कार देखील करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील अन्य विकासकामांचीही भूमिपूजने करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर सीएम एकनाथ शिंदे पहिल्यांदाच सावंतवाडीत येणार आहेत. त्यामुळे सावंतवाडीकरांकडून त्यांच जंगी स्वागत तर होणारच आहे. परंतु, धडाकेबाज निर्णय घेणारे रियल लाईफमधील 'नायक' एकनाथ शिंदे यांच्याकडून सावंतवाडीकरांच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत. सीएम शिंदेंच्या दौऱ्यानंतर सावंतवाडीकरांचे 'ते' प्रलंबित प्रश्न निकाली लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मल्टिस्पेशालिटीचा विषय आहे. आरोग्य सुविधा व डॉक्टरांची कमतरता यामुळे सावंतवाडीकरांना आजही गोवा राज्यावरच अवलंबून राहावं लागत आहे. सावंतवाडीकरांसाठी जीवनदायीनी ठरणाऱ्या परंतु जागेच्या वादात तत्कालीन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भुमिपूजन होऊन देखील 5 वर्ष रखडलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा वाद संपुष्टात येऊन कामाला सुरुवात होईल अशी सावंतवाडीकरांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी आग्रही भूमिका घेत 'ठाणे' पॅटर्न सावंतवाडीत राबवतील अशी आशा आहे. तर फेज-वन च काम होऊन ९ वर्ष रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच काम पुर्ण करत तो प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे. रेल्वे टर्मिनसचा हा मुद्दा माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू मिहिर मठकर यांनी पुन्हा एकदा उचलून धरत हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मंत्री, प्रशासनाकडे निवेदन दिली आहेत.
त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीमुळे कबुलायतदार प्रश्न रखडला असा आरोप केसरकरांनी केला होता. त्यामुळे केसरकरांचे खास असणारे सीएम आंबोली-चौकुळ-गेळे कबुलायतदार प्रश्न मार्गी लावतील का ? तसेच मतदारसंघातील रखडलेले उर्वरित गंभीर प्रश्न, समस्या व सर्वात महत्त्वाच बेरोजगार युवक-युवतींच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगाराभिमुख निर्णय घेत सावंतवाडीकरांना 'रिटर्न गिफ्ट' देतील अशी अपेक्षा आहे.
एकंदरीतच, आदरातिथ्य करण्यात नं.वनवर असणाऱ्या सावंतवाडीकरांच्या पदरात एकनाथ शिंदे काय टाकतायत ? हे त्यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे. परंतु, सध्यातरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडी येणार असल्यानं रखडलेले प्रश्न आतातरी मार्गी लागतील असा विश्वास सावंतवाडीकरांच्या मनात निर्माण झाली आहे.