
चिपळूण : संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने ‘चला करूया गणपती’ ही मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची एकदिवसीय कार्यशाळा रविवार, २७ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये मुलांना भारतीय संस्कृतीची जाणीव करून देत कलात्मकतेचा विकास घडवण्याचा उद्देश असून, यासाठी प्रशिक्षक म्हणून संतोष केतकर आणि सुनील खेडेकर मार्गदर्शन करणार आहेत.
ही कार्यशाळा २७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता रा.स्व. संघाच्या माधव बाग, बेंदरकर आळी, चिपळूण येथे सुरू होणार असून सायंकाळी ५ पर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. इयत्ता पाचवीपासून पुढील वयोगटातील कोणीही यात सहभागी होऊ शकतो. मात्र कार्यशाळेच्या व्यवस्थापनासाठी २२ जुलैपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून प्रवेशासाठी रु.१५०/- शुल्क रोख स्वरूपात प्रशिक्षणाच्या दिवशी भरायचे आहे.
प्रशिक्षणासाठी लागणारी माती आयोजकांकडून पुरवण्यात येणार असली तरी ५ इंच बाय अर्धा इंच आकाराचे लाकडी कोरणे (एक बाजू सरळ व दुसरी बाजू तिरकी), १ फूट बाय १ फूट आकाराचा जाड पुठ्ठा किंवा प्लायवूड, हात पुसायला कपडा, जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली प्रशिक्षणार्थींनी स्वतः आणावी लागेल.
या कार्यशाळेनंतर ३ ऑगस्ट रोजी रंगकाम प्रशिक्षण घेण्यात येणार असून त्या दिवशी पोस्टर रंग, रंग करण्यासाठी डिश, पाण्यासाठी भांडे आणि १ व ८ क्रमांकाचे ब्रश प्रशिक्षणार्थींनी बरोबर आणावे. रंगकामानंतर प्रत्येकजण आपली मूर्ती घरी घेऊन जाईल. मूर्ती न नेणाऱ्यांची मूर्ती आयोजकांकडून विसर्जित करण्यात येईल.
या उपक्रमासाठी अधिक माहितीसाठी संतोष केतकर (९८५०८८८२७४) आणि मंगेश बापट (९४२२००३४२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे नेतृत्व संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष शरद तांबे व महामंत्री मंगेश बापट करत आहेत.