CHILDREN'S DAY SPECIAL | बालक - पालक संवाद हरपणे चिंताजनक !

बालदिनानिमित्त कोकणसाद LIVE आयोजित 'लहानपण देगा देवा' महापरिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद ! तज्ञ मान्यवरांनी व्यक्त केली चिंता !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 14, 2022 21:30 PM
views 191  views

सावंतवाडी : पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था अस्तित्वात होती. लहान-थोरांपासून कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत होती. एकमेकांशी आपुलकीने संवाद साधत होती. अलीकडेच्या यांत्रिक युगात माणसांचे जीवनमान अमुलाग्रह पद्धतीने बदलले असल्यामुळे जो-तो यंत्रमानव झाला आहे. परिणामी बालक - पालक संवाद हरपला आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने कौटुंबिक मूल्यसंस्कार देखील लोप पावत असल्याची खंत आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ डॉ. हनुमंतराव जगताप यांनी व्यक्त केली आहे.

 कोकणचे नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद लाईव्ह' व कोकणचे प्रथम 'दैनिक कोकणसाद' यांच्यावतीने बालदिनानिमित्त आयोजित 'लहानपण देगा देवा' या परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जगताप बोलत होते. सदर परिसंवादात महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, सावंतवाडी येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. जयेंद्र परुळेकर, नेताजी बालसंस्कार केंद्र व प्रशालेच्या संचालिका डॉ. सोनल लेले आदी सहभागी झाले होते.

 दरम्यान, डॉ. जगताप पुढे म्हणाले की, आजच्या इंटरनेटच्या युगात बालकांची अपेक्षित जडणघडण व्हायची असेल तर त्यासाठी कुटुंब व त्याची शाळा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. परिसंवादात सहभागी असलेल्या डॉ. जयेंद्र परुळेकरांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, अलीकडे पालक आणि बालकांना योग्य दिशा देण्यासाठी अनेक चांगले चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत. 'थ्री इडियट'सारख्या अत्यंत मूल्य शिकवणाऱ्या चित्रपटांचे अवलोकन करून पालकांनी योग्य तो बोध घ्यावा. बालकांची संगोपनाची जबाबदारी केवळ शाळेची नसून तेवढीच ती आई-वडील आणि समाजाचीही आहे.

 डॉ. सोनल लेले यांनी सांगितले की, आजकाल पालक  बालकांच्या हाती बिनधास्तपणे मोबाईल देत आहेत, हे अत्यंत चुकीचे असून यामुळे बालमनावर योग्य वयात होणारे संस्कार चुकीच्या पद्धतीने व विक्षिप्त दिशेने जात आहेत. त्यामुळे पालकांनी सजग असणे गरजेचे आहे. सदर परिसंवादामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक, सजग नागरीक  व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. अनेक जणांनी आपले प्रश्न मान्यवरांसमोर उपस्थित केले. त्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे सहभागी असलेल्या सर्व तज्ज्ञांकडून मिळाल्यामुळे सहभागी व्यक्तींनी 'कोकणसाद लाईव्ह' चे विशेष आभार मानले.

परिसंवादाचे सूत्रसंचालन कोकणसादच्या सीनियर करस्पॉन्डंट देवयानी वरस्कर यांनी केले.