चंद्रकांत पाटलांनी शाई फेकीचा असा घेतला धसका !

पहा कशी घेतायत खबरदारी..
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 17, 2022 19:10 PM
views 379  views

ब्युरो न्युज : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीचा चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. आपल्यावर परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी पाटील यांनी घेतली आहे. 

चंद्रकांत पाटील पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळेस त्यांनी लावलेल्या फेसशिल्डने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पाटलांनी चक्क फेसशिल्ड लावलं होतं. आपल्यावर पुन्हा शाईफेक झाल्यास कोणतीही गंभीर इजा होऊ नये, यासाठी पाटलांनी ही खबरदारी घेतली आहे. कोरोना काळात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही अशाच प्रकारचा फेसशिल्डचा वापर केला होता. दरम्यान पाटलांचा फेसशिल्ड हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 


दरम्यान या शाईफेकीनंतर भाजपचे मंत्री चांगलेच सतर्क झालेले दिसून आले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेचं 13 डिसेंबरला आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेआधी पत्रकारांची कसून तपासणी करण्यात आली. कहर म्हणजे पत्रकारांच्या पेनातील शाई तपासण्यात आली.   

"सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते.  10 कोटी देणार लोक आहेत ना", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या पहिल्या तुकडीच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात म्हणाले होते. या विधानानंतर या वादाला तोंड फुटलं होतं.