पुणे : अनुकूल वातावरण नसल्यामुळे मोसमी वाऱ्यांची वाटचाल थंडावली आहे. त्यामुळे केरळमधील आगमन आणखी लांबणीवर पडले आहे. अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाच्या दिशेवर मोसमी वाऱ्याची आगामी वाटचाल अवलंबून आहे. मात्र, पोषक वातावरण राहिल्यास राज्यात १६ जूनला मोसमी वारे दाखल होतील आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून पुढे वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अनुकूल वातावरण नसल्यामुळे मोसमी वाऱ्यांची अत्यंत संथ गतीने वाटचाल सुरू आहे. केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी सात केंद्रांच्या कार्यक्षेत्रात हलका पाऊस सुरू आहे. ढगांची दाटीही वाढत आहे. केरळमध्ये मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे लवकरच केरळमध्ये मोसमी वाऱ्यांचे आगमन होईल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.