कॅ. आबा पाटील फाऊंडेशचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर | प्रा. रुपेश पाटील यांना 'आदर्श अष्टपैलू व्यक्ती पुरस्कार'

रत्नागिरीच्या परिक्षित यादव यांना उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी राज्य पुरस्कार
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 02, 2022 16:01 PM
views 284  views

सावंतवाडी : राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ऑनररी कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशन या संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर शुक्रवारी संस्थापक कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले. यंदाच्या पुरस्कारासाठी परिक्षित यादव (रत्नागिरी) यांना 'दिव्यांग व्यक्ती आदर्श प्रशासकीय अधिकारी' पुरस्कार, अशोक भोईर (कल्याण) यांना 'दिव्यांग व्यक्ती आदर्श दिव्यांग सेवा पुरस्कार', पुष्कराज कोले (सिंधुदुर्ग) यांना 'सर्वसाधारण व्यक्ती आदर्श सामाजिक कार्य' पुरस्कार, जे. बी. बारदेस्कर (गडहिंग्लज जि. कोल्हापूर) यांना 'सर्वसाधारण व्यक्ती आदर्श शैक्षणिक कार्य' पुरस्कार, प्रा. रुपेश पाटील (मूळ गाव धुळे, ह. मु. सावंतवाडी) यांना 'सर्वसाधारण व्यक्ती आदर्श अष्टपैलू व्यक्ती पुरस्कार', पुंडलिक कुंभार (खानापूर जि. बेळगाव) यांना 'दिव्यांग व्यक्ती आदर्श पाॅटरी कलाकार' पुरस्कार, तसेच  रोटरी क्लब ऑफ मुंबई, गोरेगांव वेस्ट यांना सामाजिक कार्य आदर्श दिव्यांग संस्था पुरस्कार यासाठी निवड करण्यात आली आहे, असे बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले. 

संस्थापक कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांचे वडील कॅप्टन आबा पाटील ज्यांनी ३२ वर्षे देशसेवा करत असताना १४ पदकांची कमाई केली. यामध्ये १९६१ चे भारत पोर्तुगाल युध्द, १९६२ चे भारत-चीन युध्द, १९६५ व १९७२ चे भारत-पाकीस्तान युद्ध या चारही युध्दात सहभाग घेतला. याच दरम्यान १९७२ च्या पाकीस्तान युध्दादरम्यान डोळ्याला गोळी लागून ते जखमी झाले होते. त्यानंतर इजिप्त येथे 'शांती सेना' म्हणून १ वर्ष सेवा तर हुसेनीवाला पुलाच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्ण केली. ते बॉक्सिंग, कुस्ती व हॉकी या खेळात चँपियन होते. या सर्व सेवा कार्याची नोंद म्हणून त्यांना एकूण १४ पदके बहाल केली. या त्यांच्या देशसेवेची आठवण म्हणून त्यांच्या नावाने फाऊंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब आबाजी पाटील यांनी 'पुरस्कार आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्तींनी  केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हे पुरस्कार जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून हे राज्यस्तरीय पुरस्कार कमिटीद्वारे जाहिर केलेत.

दिव्यांग असूनही दिव्यांगत्वावर मात करून बीडीओ पदापासून ते अतिरीक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत पोहचलेले व सध्या रत्नागिरी येथे सेवा करणारे परिक्षित यादव यांना उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्य पुरस्कार, दिव्यांग असूनही पाॅटरी व्यवसायात भरारी घेणारे व आपल्यासह १० अपंगांना व्यवसायात सोबत घेऊन व्यवसाय करणारे बेळगांव-खानापूर येथील पुंडलिक कुंभार यांना दिव्यांग व्यावसायिक आंतर राज्य पुरस्कार, कल्याण (मुंबई) येथील दिव्यांग व्यक्ती अशोक भोईर यांनी दिव्यांग बांधवासाठी केलेल्या उत्कृष्ठ कार्यासाठी 'आदर्श दिव्यांग समाजसेवक' म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच  दिव्यांग व गरीब, गरजू लोकांसाठी सर्वप्रकारची मदत करणारे व सिंधुदुर्गातील जवळपास ३ हजार दिव्यांग बांधवाना मोफत कृत्रिम साहित्य देणारे वेंगुर्ले येथील पुष्कराज कोले यांना राज्यस्तरीय पुरस्कार,  गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील साधना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून गोरगरीबांना शिक्षणाची दारे खुली करून देणारे जे. बी. बारदेस्कर यांना 'जीवन गौरव पुरस्कार' तसेच शैक्षणिक कार्याबरोबर विविध प्रबोधनात्मक व्याख्याने व अनेक क्षेत्रात भरीव योगदान देणारे प्रा. रूपेश पाटील यांना 'अष्टपैलू व्यक्ती राज्य पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्गातीलं हजारो दिव्यांगांना गेली ८ वर्षे जवळपास ३० लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कमेचे कृत्रिम साहित्य राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या सहकार्याने वाटप करून दिव्यांगांना मोफत दिल्याबद्दल सेवाभावी आदर्श संस्था म्हणून गौरवणार आहेत. सदरचे सर्व पुरस्कार हे पुरस्कार विजेत्यांच्या घरी अथवा त्यांच्या कार्यालयात जाऊन फाऊंडेशचे व महासंघाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रदान करणार आहोत. पुरस्काराचे स्वरूप. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा व पुष्पगुच्छ आहे, असे फाऊंडेशचे संस्थापक बाळासाहेब आबाजी पाटील यांनी कळविले आहे.