मुंबई : सत्ताधाऱ्यांकडून वारंवार महापुरूषांचा होणारा अपमान, वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात शनिवारला महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत होणाऱ्या या महामोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाचेही नेते सहभागी होणर आहेत. महाविकास आघाडीच्या महामोर्चाची चर्चा सूरू असतानाच सत्ताधारी भाजपाकडून माफी मागो आंदोलनाने उत्तर दिले जाणार आहे. त्यामुळे मुंबईत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने सामने येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेल. या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मविआच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाच्या वादावरून भाजपातर्फे मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघात आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांचा केलेला अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द असा केलेला उल्लेख, संत ज्ञानेश्वरांची खिल्ली, संत एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान केला. हा महाराष्ट्र द्रोह नाही का?, असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते आशिष शेलार यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे आज मुंबईच्या रस्त्यांवर सत्ताधारी आणि विरोधक पाहायला मिळतील.