शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला !

'सामना' च्या अग्रलेखातून टीका
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 08, 2023 08:43 AM
views 327  views

ब्युरो न्युज : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली, असा टोला सामना मुखपत्रातून लगावण्यात आला आहे.


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, दोन दिवसानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. विशेष बाब म्हणजे, अजित पवार हे भाजपसोबत जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली होती. मात्र, शरद पवारांच्या एका खेळीने भाजपचा प्लॅन फसला असंही बोललं जातंय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.


शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता व पवारांनी ते करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर पक्षाच्या प्रमुख पदावरून निवृत्तीची घोषणा करताच महाराष्ट्राच्या राजकारणास विजेचा झटका बसला. जिल्हा, तालुका स्तरातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते राजीनामा मागे घेण्याच्या हट्टावर कायम राहिले. पवारांच्या घरासमोर, कार्यालयासमोर झुंडी जमल्या. याचा अर्थ असा की, पुढारी म्हणजे पक्ष नाही. त्यांचे पर्यटन सुरूच असते.


आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, त्यांना थांबवणार नाही, असे पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग-बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापि रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो. शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकीरडय़ावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी जहरी टीका देखील सामनातून करण्यात आली.


भाजपच्या खाणाखुणांना भुलून जाणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्याचेच आमंत्रण आहे. भारतीय जनता पक्षाच्या घरास दरवाजा काय, साधा पडदाही नाही. कोणीही आत घुसतो आहे. नैतिकता व नीतिमत्ता औषधालाही उरलेली नाही. आज सीबीआय, ईडीच्या भयाने भाजपात प्रवेश करून तात्पुरता दिलासा मिळेल. पण डोक्यावरची तलवार लटकती ठेवूनच पुढे जगावे लागेल, असा सल्लाही सामनातून राजकीय नेत्यांना देण्यात आलाय.