सावंतवाडी मतदारसंघातल्या उमेदवारीचा निर्णय भाजप घेणार !

उदय सामंत यांचे 'ते' विधान केवळ त्यांच्या पक्षवाढीसाठी ! | राजन तेली यांचा टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2023 19:56 PM
views 203  views

सावंतवाडी : विधानसभेच्या कुठल्या जागा कोणाला सोडाव्यात, या संदर्भातील निर्णय भाजपा पार्लमेंटरी बोर्ड घेणार आहे, त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून केलेले वक्तव्य हे त्यांच्या पक्षवाढीच्या दृष्ठीने होते, कार्यकर्त्याच्या बैठकीत असे बोलावेच लागते, असा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी लगावला. आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा निवडणुकीमध्ये ताकद पाहूया, नंतर विधानसभेचा विचार करू, असेही ते म्हणाले.


सातार्डा येथे बंद अवस्थेत असलेल्या उत्तम स्टीलच्या जागेत असलेंर मित्तल निप्पाॅन स्टील कंपनीला संधी द्या, अशी मागणी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे हा उद्योग प्रकल्प सावंतवाडी तालुक्यात सुरू झाल्यास रोजगाराच्या प्रश्नासोबतच अधांतरीत असलेल्या चिपी विमानतळाचे भवितव्य ही उज्वल होणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

बाहेरच्या लोकांना आणून विरोधक बारसू रिफायनरी प्रकल्पाचे राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत, मात्र कोकणचा विकास होण्यासाठी असे प्रकल्प उभे राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.


श्री तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी सोबत माजी नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते. श्री तेली म्हणाले असलेंर मित्तल स्टील कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सावंतवाडी तालुक्यात उत्तम स्टील कंपनीने कवडीमोल दरात शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला, मात्र कित्येक वर्ष हा प्रकल्प उभारण्यात झाल्याने ज्या उद्देशाने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल दराने कंपनीला दिल्या, तो उद्देश साध्य झाला नाही. त्यामुळे ही जमीन शासनाने तात्काळ उत्तम स्टील कंपनीकडून ताब्यात घेऊन ती असलेंर मित्तल निप्पाॅन स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला द्यावी, अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. जवळपास ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक करणारी ही कंपनी असून हा प्रकल्प उभा राहिल्यास गोव्याला रोजगारासाठी जाणाऱ्या इथल्या युवकांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे स्थानिक जनतेची चर्चा करून कंपनीला येथे संधी द्यावी यासाठी आपला प्रयत्न आहे.


श्री तेली पुढे म्हणाले, नाणार बारसू येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरुन आज विरोधकांकडून प्रकल्पाबाबत उद्धव शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे.  आज तेथील स्थानिक आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला समर्थन दिले आहे मात्र खासदार विनायक राऊत हे विरोधात बोलत आहेत.  त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका स्पष्ट होत नाही.  दोन टर्म ज्यांनी खासदारकी उपभोगली त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणता उद्योग आणला हे जाहीर करावे. कोकणाचे भलं कशात आहे हे न पाहता राऊत येणाऱ्या उद्योगाला विरोध करून  नेमकं काय साध्य करणार ? खऱ्या अर्थाने कोकणचा विकास व्हायचा असेल तर ग्रीन रिफायनरी सारखे प्रकल्प येथे उभे राहणे गरजेचे आहे,  कोकण विकासाला चालना देण्यासाठी ग्रीन रिफायनरी प्रकल्प ही एक संधी आहे. स्थानिक जनतेने भडकाऊ लोकांपासून दूर राहावे.