भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 22, 2022 20:32 PM
views 272  views

पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, याच ठिकाणी त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल, त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअॅम्ब्युलन्सने नेण्यात आले होते. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात शहराचे महापौरपद भूषवले होते.


मुक्ता टिळक यांची अशी होती कारकीर्द

मुक्ता टिळक यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झाले आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केले पुढे त्या एमबीए देखील झाल्या. सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पुणे महापालिकेत त्यांची उत्तम कामगिरी पाहता भाजपनं त्यांना सन २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या.