बांदा : गोवा बनावटीच्या दारुची गोवा ते मुंबई बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने कारवाई केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुच्या तब्बल १ लाख ४४ हजार बाटल्या आढळल्या. यात १ कोटी ८७ लाख २० हजार रुपयांची दारू तर २५ लाखाचा कंटेनर व अन्य मुद्देमाल १२ हजार मिळून एकूण २ कोटी १२ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. या कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क कुडाळ विभागाचे कौतुक होत आहे. गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती कुडाळ पथकाला होती. त्यानुसार गेले काही दिवस त्या वाहनावर करडी नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी इन्सुली तपासणी नाका येथे कंटेनर (एमएच-१२/एलटी-७६१७) आला असता तपासणीसाठी थांबविला. तपासणी केली. असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे उघड झाले. त्याविषयी चालकाला विचारले असता गाडीत दारूसाठा असल्याचे आपणास माहिती नाही, असे त्याने सांगितले. सदर वाहन आपल्याकडे गोवा येथे पेट्रोल पंपावर दिल्याचे त्याने प्राथमिक तपासात सांगितले. सदरचे वाहन घेऊन मुंबईत घेऊन येण्यास सांगितल्याचे त्याचे म्हणणे आहे.