मुंबई : शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या पक्ष नावाने उद्धव ठाकरेंचा गट अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवू शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने पक्षाचे नवीन नाव व चिन्हांची यादी सादर केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
माहितीनुसार, ठाकरे गटाने पक्षाचे नवीन नाव म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाला पहिली पसंती दिली आहे. तर दुसऱ्या पसंतीचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे सुचवण्यात आले आहे. तसेच निवडणूक चिन्ह म्हणून उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांवर दावा केला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. संध्याकाळी उद्धव ठाकरे समाज माध्यमांवरुन याबाबत अधिकृत घोषणा करतील व जनतेशी संवाद साधतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
पक्षाचे नवीन नाव व चिन्ह काय ठेवायचे, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जवळपास एक तास ही बैठक झाली. या बैठकीतून बाहेर पडलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, पक्ष व चिन्हाबाबत आमच्याकडे फार पर्याय शिल्लक नाहीत. कायदेशीर पर्यायांसाठीही आम्हाला जास्त वेळ दिला गेला नाही. उद्धव ठाकरे आता निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेत आहेत. आजच्या बैठकीत उद्धवजींनी आत्मविश्वास जपा, आपण जिंकू, घाबरू नका, असे सांगितले. उद्धव ठाकरे लवकरच राज्यातील जनतेला संबोधित करणार, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. त्यासाठी दोन्ही गटांना 10 पर्यंत पक्षाचे नवीन नाव व चिन्ह निवडणूक आयोगाला सुचवायचे आहेत. नंतर निवडणूक आयोग या पक्षचिन्हावर व पक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. मात्र, निवडणूक आयोगाच्या पक्षचिन्ह व नाव गोठवण्याच्या निर्णयावर ठाकरे गटाने टीका केली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. निवडणूक आयोगाने आपल्या 13 पानांच्या आदेशात म्हटले आहे की, पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी कोणीही धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करू शकणार नाही. तसेच, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच हा आदेश असल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पुढे आदेशात म्हटले आहे की, दोन्ही गट स्वत:साठी नवीन नाव निवडू शकतात आणि हे नाव शिवसेनेसारखेही असू शकते. तसेच, पोटनिवडणुकीत दोन्ही गट निवडणूक आयोगाने दिलेल्या यादीतून स्वत:साठी चिन्ह निवडू शकतात. आपल्या पक्षाचे नाव व चिन्हाबाबत दोन्ही पक्षांनी 10 ऑक्टोबरपर्यंत आयोगाला कळवावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाला शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असे नाव देता येऊ शकते. यातून शिवसेना उलट अधिक जोमाने उभी राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.