मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षाचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात निकाल लागण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणच्या बाजूला जाईल याबाबतचा अंतिम निर्णय आज होऊ शकतो. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट दोघांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार महत्त्वाची आहे.
निवडणूक आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दोन्ही बाजूने कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोगाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या चिन्हाबाबत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतो याकडे राज्याचं लक्ष आहे. कारण या निकालाने राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम पडण्याची दाट शक्यता आहे.
दोन्ही गटाकडून खरी शिवसेना आपली असल्याचा दावा केला जातोय. शिंदे गटाने तर 40 आमदार, 12 खासदार आणि लाखो पदाधिकारी आपल्या बाजूने असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाने त्याबाबतचे कायदेशीर पुरावे देखील निवडणूक आयोगाकडे देखील सादर केले आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देखील काही कागदपत्रे जमा करण्यात आले आहे. दोन्ही बाजूने आपापली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून आणखी वेळ मागवण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळत आज दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला होता.
शिवसेनेच्या शिंदे गटाने काल जबाब नोंदवला होता. तर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने जबाब नोंदवला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. या बैठकीनंतर कदाचित पुन्हा एकदा नोटीस बजावली जाऊ शकते.
दरम्यान, निवडणूक आयोगाने याबाबत त्वरित सुनावणी घेण्यास उद्धव ठाकरेंच्या गटाने विरोध केला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर केले आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदेंनी त्वरित सुनावणीची विनंती केली होती. तर ठाकरे गटाने जोपर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही तोपर्यंत सुनावणी करु नये, अशी भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही, असा दावा ठाकरे गटाने आयोगात केला आहेत. तसेच केवळ भाजपला फायदा व्हावा म्हणून शिंदेंनी आयोगाला पत्र पाठवले. याबाबत तात्काळ सुनावणीची गरज नाही, असं ठाकरेंचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाची टीम आमची तयारी पाहू शकते, असं म्हणत ठाकरेंनी आयोगाला निमंत्रण दिले आहे.
उद्धव ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अधिक तपशील सादर करू इच्छित आहे. कारण आपल्याला उत्तर देण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. या प्रक्रियेत शॉर्टकट झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. चिन्हाच्या मुद्द्यावर जलद निकालासाठी दबाव आणण्यासाठी अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा वापर केला जात असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे.