मुंबई : लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतरही किरण लोहार यांच काय होणार, याबाबत मोठी संभ्रमावस्था होती. सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी असलेल्या लोहार यांचे अखेर आठव्या दिवशी निलंबन करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून तसे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
31 ऑक्टोबर रोजी त्यांना 25000 ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू असून त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. 25 हजारांची लाच घेताना लोहार यांना पकडण्यात आले असले तरी त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची माया असल्याचे तपासात समोर आले आहे. कोल्हापुरात त्यांचे फ्लॅट आणि प्लॉटही आहेत. शिवाय त्यांनी अनेक ठिकाणी जमिनीही खरेदी केलेल्या आहेत. त्यांच्या जमिनीबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. निलंबनाची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांची नियुक्ती ही मुख्यालयात राहणार आहे.
शिक्षण संस्था संचालक असलेल्या एकाने किरण लोहार यांच्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. यु-डायसद्वारे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी लोहार यांनी पन्नास हजारांची मागणी केली होती तडजोडीअंती ती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार 25 हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. शिक्षण अधिकाऱ्यांनी काही मालमत्ता जमा केली आहे का, याची देखील चौकशी केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.