मोठी बातमी : भाजपाचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

अनेक दिवसांपासून होते कर्करोगाने ग्रस्त
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: January 03, 2023 17:27 PM
views 175  views

पुणे : पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने गाठले होत. त्यातून ते सुखरूप सुटतील असे वाटत असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांच उपचारादरम्यान मंगळवारी निधन झाले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “गेले अनेक वर्ष लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचार सुरु होते. दिर्घ आजाराने आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांची लोकप्रियता होती. आजारी असताना देखील विधीमंडळात निवडणुकीसाठी ते व्हिलचेअरवर आले होते.”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “लक्ष्मण जगताप हे एका आजाराशी लढत होते. मात्र आज त्यांचं निधन झालं आहे. ही आमच्या पक्षासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची आजाराशी झुंज सुरू होती. ते यातून बाहेर येतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. मी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.”


विधानसभेचे विरोधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. “चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तडफेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम पिंपरी-चिंचवड परिसरातील जनता कधीही विसरु शकणार नाही”, अशा शद्बात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली आहे.


पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. मनपाचे महापौरपदही त्यांनी भूषविले होते. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.


व्हिलचेअर बसून विधीमंडळात केले होते मतदान

जून २०२२ रोजी मुंबई येथे राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिकीने आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक आल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्र भाजपाने या दोघांच्याही त्याग आणि समर्पण वृत्तीचे कौतुक केले होते. काही दिवसांपुर्वीच मुक्ता टिळक यांचेही निधन झालेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र भाजपाला हा दुसरा धक्का बसला आहे.


लक्ष्मण जगताप यांचा राजकीय प्रवास

१९८६ साली पहिल्यांदा नगरसेवक

२००२ पर्यंत नगरसेवक, दरम्यान महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष

२००४ पासून आमदार

२०१४ साली भाजपामध्ये प्रवेश

२०१४ आणि २०१९ असे दोनवेळा भाजपाचे आमदार

२०१७ साली महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापन करण्यात मोलाचा वाटा

तीन वर्षांपूर्वी कर्करोग निष्पन्न