मोठी बातमी : दुसरा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांकडून थेट आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा !

आव्हाड म्हणाले, लोकशाहीची हत्या ..उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 14, 2022 14:36 PM
views 404  views

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. 'पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार,' असं म्हणत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.

ते आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,

मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत


'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटकेची कारवाईही करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना नुकताच जामीन मिळाला असतानाच आता आणखी एका प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.


'

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या होत असताना मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही,' असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल ठाण्यात होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन प्रलंबित उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात येणार होते. या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा पुलाचे लोकार्पण केल्यानंतर ते मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रवाना झाले. मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजप महिला कार्यकर्त्या यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि या महिला कार्यकर्त्या हे आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करुन पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरुन 'काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो' असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत या महिला कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.