मोठी बातमी | राज्यातील सर्व शाळांना आजपासून सुट्टी

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 21, 2023 08:45 AM
views 741  views

मुंबई : वाढत्या तापमानामुळे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिल म्हणजे आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला.


राज्यातील ज्या शाळांची परीक्षा संपली आहे त्यांना सुट्टी मिळणार आहे. राज्यातील शाळांना 21 एप्रिलपासून सुट्टी सुरू होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद राहतील, असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे. 


राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालक वर्ग चिंतेत होते. सीबीएसई आणि इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी करण्यात येत होती. खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना आणि त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी केली होती.


राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार आहेत.