मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पुढील रणनीति ठरवण्यासाठी शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत अब्दुल सत्तारांनी राडा केल्याची चर्चा सुरू आहे. वर्षा बंगल्यावरील बैठकीत अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर सत्तार हे वर्षा बंगल्यावरील बैठकीतून निघून गेले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिंदे गटाकडून कामाचा आढावा घेण्यात येत होत. यावेळी अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांवर भडकले आणि त्यांना शिविगाळ केली. या प्रकारामुळे शिंदे गटाच्या नेत्यांना धक्का बसला. शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. शिविगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडली आणि माघारी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सत्तार यांच्या वागणुकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ करणे हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.
शिंदे गटातील आमदारांच्या वागणुकीमुळे आधीच सरकारबद्दल नाराजी आहे. त्यातच आता सत्तार यांच्या या प्रकरणामुळे शिंदे गटाची आणि सरकारच्या प्रतिमेला तडा जात आहे. याआधीदेखील भाजप नेत्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती.
शिंदे-फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या 100 दिवसांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी मंत्री आणि आमदारांवर सोपवण्यात आली असल्याची माहिती आहे.
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आज निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांचा पर्याय देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शिंदे गटाकडून आपल्या नावात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही समावेश असण्याची शक्यता आहे.