BIG BREKING | बारसूसह नाणारमध्येही रिफायनरी करा !

समर्थकांची प्रशासनासोबतच्या बैठकीत मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 27, 2023 20:40 PM
views 477  views

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारसूमध्ये प्रस्तावित असलेल्या रिफायनरीला स्थानिकांकडून मोठा विरोध सुरू असताना दुसरीकडे आता रिफायनरी समर्थकही प्रकल्पासाठी अधिकच आक्रमकपणे मागणी रेटत असल्याचे दिसून येत आहे. केवळ बारसूच नको, तर नाणारमध्ये देखील रिफायनरी करा, अशी आग्रही मागणी रिफायनरी समर्थकांनी गुरुवारी प्रशासनाकडे केली आहे. रिफायनरीबाबत प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी समर्थकांनी आपली भूमिका मांडली. 

राजापूरमध्ये प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी रिफायनरी समर्थकांनी मोठी मागणी केली. नाणार आणि बारसू असे मिळून रिफायनरी करा, अशी मागणी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी रिफायनरी समर्थकांनी बोलताना केवळ बारसूच नको तर यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील जागा देखील रिफायनरीसाठी घेण्यात यावी. त्यामुळे रिफायनरीची क्षमता वाढेल, अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान करण्यात आली. म्हणजेच बारसू येथे २० दशलक्ष इतक्या क्षमतेची रिफायनरी उभारली जाणार आहे. पण नाणार येथील जागा घेतल्यास ६० दशलक्ष इतक्या क्षमतेची रिफायनरी उभारली जाईल. त्यामुळे केवळ बारसूच नाही, तर नाणार येथे उपलब्ध असलेली ८५०० हजार एकर जागा देखील रिफायनरीसाठी घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बोरिंग मारण्याच्या कामाला वेग

बारसूच्या सड्यावर सलग तिसऱ्या दिवशी बोरिंग मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आजही सड्यावर माती परीक्षणासाठी लागणाऱ्या बोरिंग मारल्या जात आहेत. बोरिंग मारण्याचे काम लवकरात लवकर संपवावे, अशा पद्धतीचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून एमआयडीसी विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता बोरिंग मारण्याच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय.

रिफायनरीविरोधात ग्रामस्थ आक्रमक

सोमवार, २४ एप्रिलपासून रिफायनरीसाठी माती सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. या सर्वेक्षणाला बारसू सोलगाव आणि जवळपासच्या स्थानिकांनी जोरदार विरोध केला. स्थानिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठा फौजफाटा लावण्यात आला होता. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, रिफायनरी विरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण आणि मंगेश चव्हाण पोलिसांनी अटक केली. तर, अन्य नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. तरीदेखील ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला.