BIG BREAKING | आंगणेवाडी जत्रेत प्रथमच मिळणार मोबाईल कनेक्टीव्हीटी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोडवली वर्षानुवर्षाची समस्या
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 31, 2023 17:55 PM
views 456  views

मुंबई : नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या मार्गावरील सर्व रस्त्यांचा यंदा कायापालट झाल्यामुळे यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना याचा लाभ मिळणार आहे, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच, गेली अनेक वर्षे मोबाईल नेटवर्किंगची समस्या सोडविण्यात आली असून आंगणेवाडी परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे.  या परिसरात जीओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मोबाईल कनेक्टीव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.


मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावक-यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लोखा चाकरमान्यांचाही समावेश असतो. परतू, आंगणेवाडी परिसरात गेली अनेक वर्षे  मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे, त्यांचा हिरेमोड होत असे. त्यामुळे, भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ जिओ मोबाईल व्हॅन देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे, आंगणेवाडी यात्रेकरिता येणाऱ्या लाखो भाविकांना यंदा “नो-नेटवर्क” असलेल्या या परिसरात आता मोबाईल नेटवर्कची सुलभता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, आंगणेवाडी साठी येणाऱ्या भाविकांना यात्रेचे फोटो, व्हीडीओ काढण्याचा आनंद मिळणार आहे, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.