BIG BREAKING | बारसूत पुन्हा दडपशाही | आंदोलकासह पत्नीला अटक

एकूण आठ ते नऊ ग्रामस्थांना रत्नागिरी पोलिसांनी घेतलं ताब्यात
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 05, 2023 16:39 PM
views 224  views

रत्नागिरी : कोकणात राजापूर बारसू परिसरात रिफायनरी विरोधी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आंदोलनाचा वाढलेला जोर पाहून जिल्हा पोलीस प्रशासनाने बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष नेते अमोल बोळे व त्यांची पत्नी मानसी अमोल बोळे यांच्यासह एकूण आठ ते नऊ ग्रामस्थांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.


अमोल बोळे यांचा या रिफायनरी प्रकल्पाला सातत्याने कडवा विरोध राहिला आहे. आजवर झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. गेले काही दिवस काही पदाधिकाऱ्यांवर घालण्यात आलेल्या जिल्हा व तालुकाबंदी दरम्यान १५ दिवस अमोल बोळे हे या परिसरात आले नव्हते. मात्र काल न्यायालयाने ही बंदी उठवल्यानंतर ते पुन्हा गावात सक्रीय झाले. राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द हे अमोल बोळे यांचे गाव आहे. ते शेतकरी आहेत. त्यांना आज अटक करावी, असं त्यांनी कोणतेही काम केलं नव्हतं अशी माहिती रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे पदाधिकारी नरेंद्र जोशी यांनी दिली.



दरम्यान काही वेळापूर्वी विजय गणपत आरेकर, रमेश धोंडू गोर्ले, अक्षय अशोक बोळे,आशिष दिलीप बोळे, स्नेहल सुरेश गोर्ले, अमोल रमेश बोळे, मानसी अमोल बोळे, सोडयेवाडी येथील अमित चव्हाण या सगळ्यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.



सरकारने रिफायनरीच्या रोजगाराचे गाजर आम्हाला दाखवलं आहे पण या विनाशकाली प्रकल्पाचे गाजर आम्हाला नको आहे, आमच्या हिताची ही रिफायनरी असू शकत नाही. लोकांच्या विरोधापुढे सरकार जाऊ शकत नाही, असंही प्रकल्प विरोधात असलेल्या तरुणांकडून सांगण्यात आलबारसू परिसरात गेली आठवडाभर रिफायनरी प्रोजेक्टसाठी माती परीक्षणासाठीचे ड्रिलिंग सर्वेचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाला झालेल्या कडव्या विरोधानंतर चार-पाच दिवसापूर्वी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला होता. त्यानंतर आंदोलन पेटले होते. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर इकडे मुंबईत विविध बैठका झाल्या. उद्योगमंत्र्यांनी मध्यम मार्गासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील स्थानिकांच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असं सांगितलं.



त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून रिफायनरीला होत असलेला विरोध मावळावा, विरोधकांचे असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी बैठका व चर्चासत्रांचं आयोजन करण्याचा प्रयत्न केला, पण या सगळ्या नंतरही प्रकल्प विरोधकांचा असलेला विरोध अद्याप कायम असल्याचे दिसत आहे.