BIG BREAKING | महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक ?

कोणत्या पक्षांची कशी आहेत राजकीय समीकरणे?
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: February 18, 2023 11:36 AM
views 384  views

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा चर्चा झाली असून आता लवकरच विधानसभेच्याही निवडणुका जाहीर होऊ शकतात, हाच आयोगाच्या आजच्या निकालाचा राजकीय अन्वयार्थ असेल, असे आघाडीच्या नेत्यांना वाटते.


राज्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आले. मात्र जनतेत उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रचंड सहानुभूती तयार झाल्याचेच चित्र समोर आले. त्यामुळेच पंढरपूर, कोल्हापूर आदी पोटनिवडणुका हिरीरीने लढवणाऱ्या भाजपने अंधेरीची पोट निवडणूक लढवली नाही. आता पुण्यातील कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमध्ये निवडणुका होत असून या निवडणुकीतही भाजपला नेहमीपेक्षा अधिक प्रयत्न करावे लागत असल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.


सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आता पाच जणांचेच खंडपीठ देणार असल्याने १५-२० दिवसांमध्ये त्याचा निकाल लागल्यास व त्यात शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेल्यास त्यांच्या समर्थक आमदार व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आयोगाचा हा निर्णय शिंदे गटासाठी व पर्यायाने भाजपसाठी सोयीचा आहे. तसेच सद्य राजकीय परिस्थितीत निवडणुकीसाठी लागणारी कार्यकर्त्यांची फौज, पुरेसा निधी, सोशल मीडियापासून ते गल्ली बोळातील प्रचार यंत्रणा याबाबत भाजप इतर पक्षांपेक्षा कितीतरी पुढे असल्याने बेसावध क्षणीच महाविकास आघाडीला गाठून निवडणुका जाहीर करण्याकडेच भाजपता कल असेल, असे आघाडातील नेत्यांच्या या चर्चेत एका ज्येष्ठ नेत्याने मत व्यक्त केले. असे झाल्यास सर्व शक्तीनिशी निवडणुकीला सामोरे जाण्याबरोबरच जागा वाटपात फारशी भांडणे होऊ न देता ते पार कसे पाडता येईल, याबाबतही साधक बाधक चर्चा झाल्याचे समजते.


निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नक्की असले तरी सर्वोच्च न्यायालय त्याची सुनावणी कधी घेईल व त्यावर स्थगिती देण्यासाठी किती वेळ घेईल, हे सांगत येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व धनुष्यबाण याच्या विरोधात लढण्याची पूर्ण मानसिकता ठेवली असल्याचे शिवसेनेच्या नेत्याने या चर्चेत महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांना सांगितल्याचे समजते.