नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजुर केलेला सुमारे 28 कोटीचा निधी वेळेत खर्चित न करता तसेच या विकासकामांचा कार्यारंभ न काढल्याच्या प्रक्रियेस विलंब केल्याच्या प्रकरणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची अखेर बदली करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये तसेच जनतेच्या सोयी सुविधांच्या कामांमध्ये वारंवार विलंब लावणा-या, शासकीय कार्यालयीन निर्देशांचे पालन न करणा-या व आपल्या कामात कामचकुारपणा करणा-या सावंतवाडी विभागातील कामचुकार कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची बदली करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागाच्या सचिवांना दिले आहेत. त्यानसुार जाधव यांची बदली रत्नागिरी मधील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील रिक्तपदी करण्यात आली आहे.
जनतेच्या सोयी-सुविधांच्या योजना व विकास कामांमध्ये विनाकारण विलंब व अडथळे निर्माण करणारे विभागातील कामचुकार व बेजाबदार अधिकारी - कर्मचारी अशा कुठल्याही प्रकारास जबाबदार असल्यास यांचीही भविष्यात बदली करण्यात येईल. जनसामान्यांच्या विकास कामांमध्ये कुठलाही अडथळा वा विलंब यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशाराही मंत्री चव्हाण यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीने सिंधुदुर्गमधील विकासकामांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेस मंजुर करण्यात आलेला बांधकाम विभागाचा सुमारे 28 कोटीचा निधी हा कार्यकारी अभियंता जाधव यांनी खर्च केला नाही. त्यामुळे हा निधी शासनखाती पुन्हा जमा करण्याची वेळ बांधकाम विभागावर आली. तसेच या विकासकामांसाठी आवश्यक असणारी निविदा प्रक्रियाही श्रीमती जाधव यांनी वेळेत राबविली नाही. या सर्व निष्काऴजीपणाच्या प्रक्रियेस कार्यकारी अभियंता जाधव सर्वस्वी जबाबदार असल्याचा ठपका सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठेवला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध कामे जलदगतीने मार्गी लावण्यासंदर्भात वेळोवळी जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आदेश दिले होते. या कामांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच विशेषत मालवण मधील आंगणेवाडी येथील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करुन सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये 17 कोटीचा निधी सुमारे दिड महिन्यांपूर्वीच 9 कामांसाठी मंजूर करण्यात आला होता.
या निधीच्या माध्यमातून आंगणेवाडी परिसर तसेच आंगणेवाडी यात्रेसाठी येणा-या भाविकांना नागरी सुविधा पुरविणे व तेथील विकास कामे, या परिसराचा कायापालट करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याचे आदेश विभागाच्या कार्यकारी अभियंत्या जाधव यांना वेळोवेळी शासनस्तरावर दिले होते. परंतु सुमारे 1 ते दीड महिन्याचा कालावधी लोटूनही या कामांमध्ये प्रत्यक्ष काहीच प्रगती सार्वजनिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून झाली नाही. विशेष म्हणजे मालवणमधील आंगणेवडीतील भराडी देवीची जत्रा येत्या फेब्रुवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. राज्यातून लाखो भाविक दरवर्षी जत्रेला येत असतात, त्यामुळे या भाविकांना योग्य सोयी सुविधाचा लाभ व्हावा, यादृष्टीने सदर कामे तातडीने व्हावी यादृष्टीने मंत्री चव्हाण व सचिव स्तरावर सातत्याने या विकास कामांचा प्रगतीबाबतचा पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु वारंवार सूचना व निर्देश देऊनही या कामांना मात्र प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकली नाही. याबाबत मंत्री चव्हाण यांनी विभागाच्या सचिवांकडे संबंधित अधिका-यांच्या कामचुकारपणाबद्दल वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती.
त्याचप्रमाणे कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे सुशोभीकरण करण्याची प्रक्रिया सात दिवसांत सुरु करण्याचे तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी करावयाची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी सांवतवाडी विभागात कार्यरत असणा-या कार्यकारी अभियंत्याना दिले होते. मात्र प्रत्यक्षात या कामात कोणतीही ठोस कार्यवाही अद्यापही झाली नाही. वा कुठलीही ठोस प्रक्रिया झाली नाही. यांसदर्भात कार्यकारी अभियंता जाधव यांना वेळोवेळी निर्देश देऊनही त्यांना या कामामध्ये विनाकारण विलंब लावला. सावंतवाडी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्याऎवजी वेळोवेळी केलेल्या कामचुकारपणामुळे या विभागातील अनेक विकास कामांना खीळ बसत गेला. विकासकामे रखडल्यामुळे येथील लोकप्रतिनिधी व स्थानिक पदाधिका-यांचाही त्यांच्या कार्यपध्दतीबद्दल रोष वाढत चालला होता.तसेच तक्रारीही वाढल्या होत्या.
अखेर कामातील कामचुकारपणा, कार्यपध्दतीमधील विलंबपणा यामुळे अखेर मंत्री चव्हाण यांनी सचिवांना आदेश देऊन कार्यकारी अभियंता चव्हाण यांची बदली करण्याचे निर्देश दिले. भविष्यात सार्वजनिक विभागातील जे अधिकारी व कर्मचारी आपल्या कामात कामचुकारपणा करतील. तसेच ज्या कामचुकार अधिका-यांमुळे विभागातील विकास कांमाना खीळ बसेल व जनसामान्यांची गैरसोय होईल अशा अधिकारी व कर्मचारी यांची बदली करण्यात येईल, असा इशाराही मंत्री चव्हाण यांनी दिला.