BIG BREAKING | राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत ?

'द न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या बातमीनं खळबळ
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 18, 2023 15:53 PM
views 614  views

मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर एका बातमीने खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलंय. या बातमीनं खळबळ उडाली आहे. योग्य वेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याची ही बातमी आहे. अजित पवारांनी 40 आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधला असल्याचंही या वृत्तपत्रात म्हणण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी अजित पवारांनी शपथ घेतल्यास सरकार पडण्याची वेळ येणार नाही, असं बातमीत म्हणण्यात आलं आहे.

दरम्यान, अजित पवार भाजपसोबत जात असल्याच्या चर्चा सुरु असताना आता स्वत: त्यांनीच याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असं अजित पवारांनी म्हटलं.

40 आमदारांच्या सह्या कुणीही घेतल्या नाही. सही घेण्याचं काहीही कारण नाही. या बातम्यांना काहीही आधार नाही. कुणी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे. अनेक आमदार कामानिमित्त येत असतात. आजही नेहमीप्रमाणे आमदार भेटायला आले होते. आमदारांची वेगवेगळी कामं होती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. मात्र अशा बातम्यांमुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होतो. अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यातील महत्वाच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.


माध्यमांचे प्रतिनिधी माझ्या घराबाहेर कॅमेरे लावतात. तुम्ही अंदाज व्यक्त करताय. या गोष्टी थांबवल्या पाहिजे. माध्यमांनी सभ्यता पाळली पाहिजे. मी राष्ट्रवादीतच राहणार हे काय आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का, असा संतापही अजित पवारांनी व्यक्त केला.