भोसले फार्मसीचं नायपर परीक्षेत सुयश

Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 16:00 PM
views 257  views

सावंतवाडी : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थांमधील पदव्युत्तर प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नायपर- २०२३ या राष्ट्रीय परीक्षेत येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. कॉलेजच्या एकूण ५ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रँकिंगमध्ये स्थान मिळवले आहे. अल्फिया समीर बेग ३३८, नम्रता मंगेश घाडी ९५२, आकांक्षा गजानन टक्के २१०६,अजयकुमार सूर्यनारायण सिंह २६०८ व नरेश बजरंग ताम्हणकर २६७७ गुणांसह यश संपादित केल आहे.


औषधनिर्माण क्षेत्रात उच्च गुणवत्ताधारक संशोधक व शास्त्रज्ञ तयार व्हावेत यासाठी केंद्र शासनाच्यावतीने नायपर संस्था चालविल्या जातात. या संस्थाना स्वायत्त दर्जा असून त्या अनुक्रमे मोहाली, अहमदाबाद, हाजीपुर, हैदराबाद, कोलकाता, गुवाहाटी व रायबरेली या ठिकाणी स्थित आहेत. येथे फार्मसीमधील एम.एस., एम.बी.ए., एम.टेक. व पीएचडी हे अभ्यासक्रम चालविले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील देण्यात येते. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने आपल्या कामगिरीत सातत्य राखत गेली पाच वर्षे नायपर परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. या परीक्षेच्या सरावासाठी कॉलेजने स्वतंत्र मार्गदर्शन तासिका आयोजित केल्या होत्या. विशेष तासिका, परीक्षा अभ्यासाचे नियोजन व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच हे यश मिळाल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ. विजय जगताप व परीक्षा समन्वयक डॉ. प्रशांत माळी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.