
मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या पैशाची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
या फसवणूकीच्या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्विय सहाय्यक असल्याचे सांगत ६ आमदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आता एका भामट्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सर्वांनाच प्रतिक्षा लागलेली असताना हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील चार आमदारांकडे पैशाची मागणी केल्याचे समोर आले आहे.
नागपुरातील भाजपचे (BJP) आमदार विकास कुंभारे, भाजप आ. टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी हा फोन आला होता. ज्यामध्ये निरज सिंह राठोड नामक व्यक्तीने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत पैशाची मागणी केली.
मंत्रीपद मिळेल मात्र पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये द्या , असे या आमदारांना सांगण्यात आले. मात्र आमदार विकास कुंभारे यांना संशय आला. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
या प्रकरणात आ. तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या राज्यातील आणखी दोन आमदारांकडेही या व्यक्तीने कोटय़वधींची मागणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून ताब्यात घेतले आहे.














