पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत अवजड वाहनांना बंदी...!

Edited by:
Published on: September 12, 2023 10:55 AM
views 1033  views

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी पनवेल ते सिंधुदुर्ग दरम्यान गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना १६ सप्टेंबरपासून वाहतूक बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २० सप्टेंबपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर पनवेल, पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणवकली, कुडाळ, सावंतवाडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

तसेच पाच व सात दिवसांच्या गणपती विसर्जन तसेच प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी २३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशीदिवशी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. या बंदीतून अत्यावश्यक सेवेतील वाहने, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले असून याबाबतचा शासन आदेश काढण्यात आल्याचे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी सांगितले.