कणकवली : कनेडी बाजारपेठनजीक शिवाजीनगर येथील वेरोनिका बेरनाद फर्नांडिस यांच्या घरावर गुरुवारी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास वीज पडून आठ जखमी झाले. यात प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे. यातील काही महिलांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये कोणाची एक बाजू बधीर झाली तर कोणाचे पाय वाकडे झाले, कोणाला बोलता येत नव्हते, एवढा मोठा हा विजेचा धक्का होता. या महिलांवर कनेडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी श्री.फर्नांडिस यांच्या घरात ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना सुरू असताना ही घटना घडली. 6.30 वा. च्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू होता, लाईट गेलेली होती, त्यावेळी अचानक फर्नांडिस यांच्या घराच्या गडग्यावर आणि घरावर विज कोसळली. यात गडग्याचे नुकसान झाले, तसेच घरातील सर्व लायटिंगसह वीज उपकरणे जळून गेली. त्यात प्रार्थनेत असलेल्या आठ महिलांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये कोणाची एक बाजू बधीर झाली तर कोणाचे पाय वाकडे झाले, कोणाला बोलता येत नव्हते, एवढा मोठा हा विजेचा धक्का होता. त्यावेळी घरात सुमारे वीस माणसे होती.कोणीतरी फोन करून कळवल्यावर हा प्रकार कनेडी बाजारपेठेत समजला. त्यांनतर अनेकांनी त्या घरी धाव घेऊन धक्का बसलेल्या महिलांना कनेडीत डॉ. नागवेकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.