खड्ड्यांमुळे शिवसैनिकाचा जीव गेला, जिथे शेवटचा श्वास घेतला तिथेच गोविंदा पथकाचे अनोखं आंदोलन

शिवसैनिक नारायण भोईर यांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग नाही
Edited by: मुंबई प्रतिनिधि
Published on: August 19, 2022 18:01 PM
views 231  views
हायलाइट
रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन
कल्याण नगर महामार्गावरील कांबा गावात गोविंदा पथकाचं आंदोलन
भर रस्त्याच्या खड्यात चार थराचा मानवी मनोरा रचत आंदोलन

कल्याण : रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात कल्याण-नगर महामार्गावरील कांबा गावात गोविंदा पथकाने अनोखे आंदोलन केलं. खड्डे बुजवण्यासाठी शिव नवतरूण गोविंदा पथकाने भर रस्त्याच्या खड्यात चार थराचा मानवी मनोरा रचत प्रशासनाचा निषेध केला. 


महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे. तसेच या खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या शिवसैनिक नारायण भोईर यांना लवकरात लवकर प्रशासकीय मदत मिळावी, यासाठी गोविंदा पथकाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अहमदनगर महामार्गाची कल्याणजवळील म्हारळ ते कांबा या दरम्यान अक्षरश: चाळण झाली आहे. दूध फळभाज्या यांच्यासह प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला हा रस्ता वर्षांतून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ खड्डेमय असतो.

म्हारळ पाडा ते पाचवामैल हे अंतर जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतराचे असेल. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी अर्धा तास लागतो आणि संध्याकाळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वारंवार स्थानिक रहिवाशी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेक तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या या महामार्गावरील कांबा गावातील शिव नवतरूण गोविंदा पथकाने आज या महामार्गाच्या खड्ड्यामध्ये चार थराचा मानवी मनोरा उभा केला.

तसेच खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या नारायण भोईर यांना लवकरात लवकर प्रशासकीय मदत मिळावी व महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशा प्रकारचे पोस्टर हातात घेऊन सलामी दिली. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवले नाही तर उग्र आंदोलनाचा इशाराही या गोविंदा पथकाने दिला आहे.