आशाताई, तुम्हाला 'शंभरीपार'ला पर्याय नाही...!

राज ठाकरेंच्या काळजाला भिडणाऱ्या शुभेच्छा
Edited by: जुईली पांगम
Published on: September 08, 2023 12:00 PM
views 269  views

मुंबई: गेली अनेक दशके आपल्या गोड गळ्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायिका आशा भोसले आज, ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास शब्दांत शुभेच्छा दिल्यात. 

राज ठाकरे म्हणतात, आज आशाताईंचा नव्वदावा वाढदिवस. मागचं शतक अद्वितीय होतं, काय माणसं जन्माला आली त्या शतकांत. प्रतिभा ओसंडून वाहत होती असं वाटावं इतकी ती चहुबाजुंनी समोर येत होती. त्या प्रतिभेचे दोन सर्वोच्च आविष्कार म्हणजे लता दीदी आणि आशा ताई. त्यात दीदींचा आवाज तुम्ही कुठेही ऐकलात तरी क्षणात आत, खोल नेणारा, कुठेतरी मुळापासून गदागदा हलवणारा, घुसळून टाकणारा, खोल आत नेऊन त्याच्याशी सख्य करायला लावणारा.    

पण आशाताईंचा आवाज मात्र तुम्हाला जमिनीवर आणतो, पुन्हा मर्त्य जगात आणतो. माणूस म्हणला की प्रेम, वासना, झुगारून देणं, तडफडण हे सगळं आलंच, ह्या प्रत्येक भावनेचा आविष्कार आशाताईंच्या आवाजातून प्रकट होताना दिसत राहिला. म्हणून मी नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, भीमसेन अण्णा, किशोरीताई आमोणकर, कुमार गंधर्व ह्यांच्यासारखे दैवीस्पर्श लाभलेले, तसंच अनेक गुणी संगीतकार, लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, शिल्पकार, हे जर भारतात जन्मले नसते तर भारताला वेड लागायची वेळ आली असती. अतिशयोक्ती वाटेल, पण ही माणसं होती, त्यांची कला होती म्हणून आसपास इतक्या वाईट गोष्टी घडताना पण जगण्याचं बळ मिळालं. अन्यथा ह्या देशात अराजकच माजलं असतं.   वर म्हणलं तसं तो प्रतिभा ओसंडून वाहण्याचा काळ होता, आता ते सगळं कुठेतरी रितं झाल्यासारखं वाटतंय. पण काळ असाच असतो. हे रितेपण किती, तर आज देखील संगीताचे जे काही शोज टीव्हीवर दिसतात, त्यात जी गाणी गायली जातात ती देखील त्याच काळातील, ह्याच गायक आणि संगीतकारांची असतात. ह्यावरूनच ह्या गायक आणि संगीतकारांपुढे किती मोठं आव्हान आहे हे जाणवतं. अर्थात ह्या रितेपणाचं दुःख मला नाही कारण मी ह्या दोघींना ऐकलं आहे, अनुभवलं आहे आणि प्रत्यक्ष असंख्य वेळा पाहिलं आहे. जर पुन्हा भारतात कधी प्रतिभेचा बहर येणार असेल, तर ज्या माणसांच्या रूपाने तो बहर येईल, त्यांचा पिंड आशाताईं सारख्यांच्यामुळेच घडेल ह्याबद्दल शंकाच नाही. आशाताई नव्वद इत्यादी आकडे हे सामान्यांसाठी असतात, तुम्हाला 'शंभरीपार'ला पर्याय नाही. आशाताईंना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा, अशा शब्दांत राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्यात.