महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला

22 हजार कोटींच्या प्रकल्पाच पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
Edited by: ब्युरो
Published on: October 28, 2022 12:17 PM
views 311  views

मुंबई : फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. आता या प्रकल्पाचं उद्धाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. 

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. 22 हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण आता हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी वडोदऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचं उद्धाटन करणार आहेत. 

या आधी हजारो कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, जो महाराष्ट्रातील दोन लाख युवकांना रोजगार देणार होता, तो प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता 22 हजार कोटींचा हा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट गुजरातला जाणार आहे.