मुंबई : ज्या लालबाग परळमध्ये लाल बावट्याचा जोर कमी करण्यासाठी शिवसेनेने शर्थीचे प्रयत्न केले, प्रसंगी रक्ताचा सडा पडला, ही लढाई अगदी खूनापर्यंत गेली, त्याच कम्युनिस्ट पार्टीने आता संघर्षातून नव्याने उभ्या राहत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवेसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत लढू. भाजपविरोधातील लढाईतही तुमच्या साथीला असू, असा विश्वास कम्युनिस्ट नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरीतील पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. भाजप विरोधात लढ्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वासही शिष्टमंडळाने ठाकरेंना दिला. माकपचे सचिव कॉम्रेड मिलिंद रानडे, ज्येष्ठ नेते कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी आज दुपारी अडीच वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते अनिल परब, रवींद्र वायकर, अरविंद सावंत, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर आदी नेते उपस्थित होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ताकद अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मर्यादित असली तरी दोन टोकाच्या विचारधारा एकत्र येणं, कम्युनिस्टांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देणे ही राजकारणातली मोठी घडामोड आहे. शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून सेनेचा कम्युनिस्टांसोबत अतिशय तीव्र संघर्ष राहिला आहे. दोन्ही पक्षांमध्ये अक्षरश: हाडवैर होते. या संघर्षातूनच कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची मुंबईत १९७० मध्ये हत्या झाली. गिरणी कामगारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी दोन्ही संघटनांमध्ये अतिशय तीव्र स्पर्धा होती. बाळासाहेब ठाकरे तर कम्युनिस्ट पक्षाचा उल्लेख लाल माकडं असं करीत असंत. पण मधल्या काळात बदललेलं राजकारण, उद्धव ठाकरेंची भूमिका आणि भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी म्हणून हे हाडवैरी एकत्र आल्याचं चित्र आहे.
लालबाग परळ गिरणगावात कम्युनिस्टांच्या लाल बावट्याचा जोर होता. कम्युनिस्टांना मानणारा वर्ग होता. हाच जोर शिवसेनेने कमी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान शिवसेना कम्युनिस्टांमधला संघर्ष पेटला. याचदरम्यान कम्युनिस्ट नेते आमदार कृष्णा देसाई यांची ५ जून १९७० साली या दिवशी हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात गजहब निर्माण झाला. त्यांच्या हत्येचा संशय शिवसेनेवर होता. देसाई यांच्या हत्येनंतर परळच्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी सरोजिनी कृष्णा देसाई आणि शिवसेनेच्या वानराव महाडिक यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत वामनराव महाडिकांनी 1679 मतांनी विजय मिळवून शिवसेनेचा भगवा पहिल्यांदाच विधानसभेत नेला.