मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल अकरा महिन्यांनी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे. अनिल देशमुख सध्या आर्थर रोड जेलमध्या न्यायलयीन कोठडीत आहेत.
न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला. देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. देशमुख यांना ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयच्या खटल्यात ते अजूनही कोठडीत आहेत.
अनिल देशमुखांविरोधात आरोप काय ?
अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला.