ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील दिवा स्थानकात रविवारी सकाळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. या संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती. आज सकाळची दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अनेक तास उलटून स्थानकात आली नाही. तसेच रेल्वे प्रशासनाकडूनही याबाबत काही माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत वाहतूक रोखून धरली. या प्रवाशांनी १, २ आणि ३ या रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडल्याने मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे पोलीस बराचवेळ या प्रवाशांची समजूत काढत होते. अखेर तब्बल पाऊणतास गोंधळाच्या परिस्थितीत गेल्यानंतर प्रवाशी ट्रॅकवरुन बाजूला झाले आहेत. मात्र, यामुळे मध्य रेल्वेच्या उर्वरित वेळापत्रकाचेही तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभर मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची दाट शक्यता आहे.
काल पनवेलच्या जवळ रेल्वे ट्रॅक वरती मालगाडी घसरल्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले होते. याचा परिणाम आज सकाळीही जाणवत होता. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस अनेक तासांच्या विलंबाने धावत आहेत. मध्यरात्री सीएसएमटीवरुन सुटलेली तुतारी एक्स्प्रेस ही रात्री तीन वाजता दिवा स्थानकाच्या जवळ थांबली होती. तेव्हापासून ही एक्स्प्रेस एकाच जागी थांबून आहे. त्यामुळे गाडीत अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. रेल्वे कडून कोणतीही सूचना दिली जात नसल्याने प्रवाशी नाराज आहेत.
तर दिवा पॅसेंजर ही गाडी पहाटे पावणेसातला दिवा स्थानकात येते. मात्र, अनेक तास उलटूनही गाडी स्थानकात आलीच नव्हती. अशातच वंदे भारत, जनशताब्दी या एक्स्प्रेस कल्याण, कर्जतमार्गे वळवण्यात आल्या. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा आणखीनच उद्रेक झाला आणि त्यांनी ट्रॅकवर उतरत संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती.