अंधेरी पोटनिवडणुक | सस्पेन्स अखेरच्या टप्प्यावर | काऊंटडाऊन सुरू !

भाजपचा राजीनामा की लढत रंगणार?
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 17, 2022 08:38 AM
views 373  views

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेला अंधेरी पोटनिवडणुकीचा सस्पेन्स आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. पोटनिवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे भाजप काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं.


राज ठाकरे यांच्या या पत्रानंतर शरद पवार  यांनीही पत्रकार परिषद घेऊन हीच मागणी केली. उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. आमदार प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली.


अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला.


मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर भाजप आणि शिंदेंची ही पहिली टेस्ट असेल. महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. तर भाजपच्या मुरजी पटेल यांना एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा आहे.