भाजप-शिंदे गटाविरोधात आ. बच्चू कडूंनी थोपटले दंड

विधान परिषद निवडणुकीत ‘प्रहार’चे उमेदवार भाजपला भिडणार
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 07, 2023 18:43 PM
views 275  views

अमरावती : विधान परिषदेच्‍या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी केली असताना सत्‍तारूढ आघाडीतील आमदार बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाने पाचही मतदारसंघांमध्‍ये दंड थोपटल्‍याने सत्ताधारी गटातील विसंवाद समोर आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रहार शिक्षक संघटना व‎ महाराष्‍ट्र इंग्रजी शाळा संस्‍था संघटनेचे (मेस्टा) पाचही विभागाचे उमेदवार‎ जाहीर केले आहेत. त्यामुळे पदवीधर व‎ शिक्षक मतदार संघात भाजप-शिंदे गटाच्‍या विरोधात प्रहार पक्षाने‎ भूमिका घेतल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. ३० जानेवारीला पदवीधर व‎ शिक्षक मतदार संघासाठी‎ ही निवडणूक होत आहे.


अमरावती विभाग पदवीधर मतदार‎ संघासाठी किरण चौधरी,‎ मराठवाडा औरंगाबाद शिक्षक‎ मतदार संघातून डॉ. संजय तायडे,‎ कोकण विभागातून नरेश कोंडा आणि‎ नाशिक विभागातून प्रा. सुभाष‎ जंगळे यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे. यामध्ये प्रहारचे दोन तर‎ मेस्टाचे तीन उमेदवार निवडणुकीत‎ उभे आहेत. या उमेदवारांना स्वाभिमानी शिक्षक संघटना,‎ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद,‎ महात्मा फुले शिक्षक परिषद,‎ शिक्षक भारती, शाळा कृती समिती,‎ मराठा क्रांती मोर्चा, शिक्षक‎ समन्वय संघ, मराठवाडा‎ मुख्याध्यापक संघ, जिल्हा परिषद‎ माध्यमिक शिक्षक संघ आदींनी पाठिंबा दिल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे. २०१७ मध्‍ये अमरावती पदवीधर मतदार संघात झालेल्‍या निवडणुकीत डॉ. दीपक धोटे यांनी प्रहारतर्फे लढत दिली होती, पण या निवडणुकीत त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला होता.


गेल्‍या तीन वर्षांपासून या पाचही मतदार संघांमध्‍ये प्रहार पक्षाने तयारी केली होती. मतदार नोंदणीत सक्रीय सहभाग घेतला होता. यासंदर्भात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहि‍ती देण्‍यात आली होती. सत्‍तारूढ आघाडीचे उमेदवार देताना प्रहारचे मत विचारात घ्‍यावे, अशी विनंती आपण केली होती, पण त्‍यांच्‍याकडून निरोप न आल्‍याने आम्‍ही उमेदवार जाहीर केले असून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, असे बच्‍चू कडू म्हणाले.