सावंतवाडी : भाजपचे युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवस गौरव सोहळयात सांगोल्याचे आमदार शहाजीबापु पाटील यांची खास उपस्थिती होती. त्यांनी आपल्या भाषणात दोन राऊतांचा उल्लेख केला. आज याच संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता, ते म्हणाले, दोन राऊतांपैकी एक आत आहे, एक बाहेर आहे. आतला विचारतोय, तु कधी येणार ? सावंतवाडी इथं पत्रकारांशी ते बोलत होते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांत सिंधुदुर्गात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती करून लढणार का ? असा सवाल केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांना केला असता सोयीच्या ठिकाणी युती करणार, त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार विचार विनिमय करून याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. सावंतवाडीत माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पावसानं शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई लवकर मिळून द्यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तर लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून कोकणात रोजगार आणणार असून युवक व महिलांना रोजगार प्राप्त करून देणार आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली असून काही दिवसात उद्योगासंदर्भातील केंद्र जिल्ह्यात दिसतील. मोठे उद्योजक, कंपन्या कोकणात येतील कोकणी माणूस उद्योजक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी राजकीय आत्महत्या केली असून पक्षातून ४० आमदार डोळ्यांदेखत जात असताना देखील ते काही करू शकले नाही असा टोला हाणला. तर भास्कर जाधव, सुषमा अंधारेंवर देखील तोफ डागली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, ज्येष्ठ नेते संदीप कुडतरकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.