
पुणे : यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरणार आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी एक स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीने 5 ते 7 जून रोजी निमंत्रक स्थळांना भेट दिल्यानंतर आज झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केल्याची माहिती अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.
या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाहक सुनिता राजे पवार,कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 99 व्या संमेलनाला आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळणार आहे.
साताऱ्यातील हे चौथे संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी यंदा 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार असल्याचे सांगितले.ते म्हणाले, "साताऱ्याला 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालाय .यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते . गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती.
साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे .1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर 3 मे 1905 साली रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते . 1962 मध्ये नवी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते .
शाहू स्टेडीअमवर होणार संमेलन
नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की 1993 साली 66वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम 14 एकरात असून तिथे मुख्य मंडप, 2 इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी 3 सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची 8 एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.