आदित्य ठाकरे आता खळ्यात नाही जेल मध्ये दिसतील !

नारायण राणेंचा जोरदार 'प्रहार'
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 27, 2023 19:12 PM
views 237  views

सिंधुदुर्ग : जाहीर सभेऐवजी खळ्यात बैठक घ्यायची वेळ येणे ही उबाठा शिवसेनेची अधोगती असल्याची बोचरी टीका करतानाच काही दिवसाने आदित्य ठाकरे हे खळ्यात नाही तर सुशांत राजपूत प्रकरणी जेल मध्ये दिसतील असा गौप्यस्फोट केंद्रीय लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

       नौसेना दिनानिमित्त ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती येणार आहेत. या कार्यक्रमांचे नियोजन नौदल आणि राज्यशासन यांच्या मार्फत केले जात असल्याची माहिती देण्यासाठी लाईफ टाईम मेडिकल कॉलेज पडवे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. त्यांनतर प्रधानमंत्री आणि महनीय व्यक्तींच्या दौऱ्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय फायदा होणार? या  पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले की, २४ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला. त्याने जिल्ह्याला किती फायदा झाला असा प्रश्न करत ठाकरे जिल्ह्याला काही देणार नाही असे सांगत जिल्ह्याला काय तरी मिळावे यासाठी महनीय व्यक्तींनी जिल्ह्याचा दौरा करावा अशी आपली अपेक्षा नाही. जिल्ह्याचा विकास व्हावा ही आपली अपेक्षा आहे आणि तो होत असल्याचे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

जाहीर सभेवरून खळ्यात जाण्याची वेळ !

       एके काही शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते जाहीर सभा घ्यायचे. मात्र आता उबाठा शिवसेना प्रमुखांच्या मुलाला जाहीर सभेऐवजी खळ्यात जाऊन बैठक घ्यावी लागते. हे दुर्दैव असून ही शिवसेनेला लागलेली अधोगती असल्याची खरमरीत टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.

आता खळ्यात नाही जेल मध्ये दिसतील!

      शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर नागरिकांच्या खळ्यात जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता १६ आहेत तेवढेच काय ५ आमदार येताना मुश्किल आहे. तरीही ते १०० च्यावर आमदार येतील अशा बढाया मारत आहेत. परंतु आदित्य आणि संजय राऊत हे काही दिवसांनी खळ्यात नाही तर सुशांत राजपूत प्रकरणी जेल मध्ये दिसतील असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

       मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आपली पूर्वी पासूनच मागणी आहे. मात्र ते कोणाचे काढून न घेता द्यावे असे सांगत मराठा समाज कोणालाच घाबरत नाही आणि तो इतिहास सांगत आहे. त्यामुळे हा समाज अन्य कोणाला घाबरणारा नाही असेही नारायण राणे यांनी सांगितले.