मुंबई : "आता हसून-हसून मिळालं काय, जी गद्दारी झाली त्यातून काय साध्य झाले. सुरुवातीला जे लोकं गुवाहाटीला गेले त्यातून किती लोकांचा विश्वास राखला गेला, त्यांचादेखील विश्वासघात झाला आहे. त्यांच्यासोबत गद्दारीच झाली आहे. ज्या लोकांना पुढे जाण्याची संधी होती, त्यांचेदेखील राजकीय करिअर या गद्दारीतून संपत आले. 50 थरांतून वरच्याच लोकांनी त्यांना लाथ मारून मलाई खाल्ली, अशी खरमरीत टीका शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर केली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
"दहीहंडीचा जीआर अद्याप तरी कुठेही हातात आलेला नाही. अनेक मंडळ माझ्याकडे येतायेत आणि सांगतायेत की पाच टक्के आरक्षण नेमके कशाप्रकारे मिळणार आहे, हा त्यांचा विश्वासघात असून, त्यांची धूळफेक केली जात आहे. सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीसाठी, राज्यासाठी कुठेही चांगले नाही. लोकांना देखील आता विश्वास बसला असून, हे सरकार आता लोकशाहीविरोधी आहे", असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
स्थिती जैसे थे
राज्यातील 92 नगर परिषदा, 4 नगरपंचायती आणि 271 ग्रामपंचायत निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 5 आठवड्यानंतर या प्रकरणी सुनावणी होणार असून तोपर्यंत स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आजचा कोर्टाचा निर्णय हा फार महत्वाचा आहे. मार्च-एप्रिल दरम्यान सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की, मार्चच्या आधी असलेली वॉर्ड रचना फायनल असेल. मात्र, राज्यात सरकार बदलले असून, तात्पुरते सरकार आले आहे. त्या सरकारने वॉर्ड रचना बदलून आपल्या सोयीची करून घेतली. एकंदरीत वॉर्ड रचना, आरेचा निर्णय हा केवळ शिंदे-फडणवीसांनी स्वत:च्या स्वर्थासाठी आहे. मुंबईचा, महाराष्ट्राचा किंवा जनतेचा हित न बघता हा निर्णय घेण्यात आला आहे."
हे तात्पुरते सरकार
शिंदे-फडणवीस सरकार हे तात्पुरते असून यांचा शेतकरी, महिला अत्याचार यावर लक्ष नाही. त्यांना फक्त ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणे हेच त्यांना येते. मात्र, आम्हाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.