डिजीटल मीडिया पत्रकारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवु : स्वागताध्यक्ष, मंत्री शंभुराजे देसाई

डिजिटल मीडिया अधिस्विकृतीबाबत चर्चा करून धोरण ठरवूया | मंत्री देसाई यांची ग्वाही
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 29, 2022 12:17 PM
views 140  views

महाबळेश्वर : डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अनेक अडचणी येतात. स्थानिक पातळीवर पत्रकारांना ओळखपत्राचा आणि अधिस्विकृतीचा  विषय मोठा आहे.  मी स्वतः गृहराज्यमंत्री असताना अनेक प्रश्न आपल्याकडे आले होते. मात्र, कुठचा पत्रकार अधिकृत आणि अनधिकृत हे समजत नव्हते. त्यामुळे निर्णय घेता येत नव्हता. मात्र, राजा माने आता तुम्हीच या संघटनेमार्फत ज्या काही सूचना, समस्या, मागण्या आहेत, त्याबाबत जे काही धोरण ठरवायचे आहे ते ठरवूया. डिजिटल मिडीयाचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवून सर्व समस्या मार्गी लावल्या जातील. अशी ग्वाही अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.


डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर येथे सुरु आहे. या अधिवेशनात मंत्री शंभूराजे देसाई बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अधिवेशन भिलार गावात व्हावे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच सूचना होती. मुख्यमंत्र्यांना अचानक नंदुरबार येथे जावे लागले. मात्र, त्यांनी डिजिटल मिडीयाचे प्रश्न समजावून घेण्याच्या सूचना त्यांनी आपल्याला केल्या आहेत. या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवून यावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतले जातील. राज्यातील सर्व डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना राजा माने यांनी संघटित केले हे कौतुकास्पद आहे. डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.